कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी लक्ष्मण उर्फ गौरव वराडकर याला जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात गौरव वराडकरच्या वतीने अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. प्रणाली मोरे, अॅड. विनय मांडकुलकर, अॅड. वृषांग जाधव आणि अॅड. सुयश गवंडे यांनी बाजू मांडली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, पक्या बिडवलकर हा कुडाळ येथे सिद्धेश अशोक शिरसाट यांच्याकडे कामाला होता आणि त्याने तीन वर्षांपूर्वी सिद्धेश शिरसाटकडून काही पैसे घेतले होते. या पैशांच्या देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. याच वादातून मार्च किंवा एप्रिल २०२३ च्या सुमारास सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या तीन साथीदारांनी पक्याला चेंदवण येथील त्याच्या घरातून जबरदस्तीने बोलावून नेल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सुमारे दोन वर्षांपासून पक्या बेपत्ता असल्याची तक्रार मालती चव्हाण यांनी ९ एप्रिल, २०२५ रोजी निवती पोलिसांत दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लक्ष्मण वराडकर याच्यासह सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ), गणेश नार्वेकर (रा. माणगाव), सर्वेश केरकर (रा. सातार्डा) आणि अमोल शिरसाट (रा. कुडाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमोल शिरसाट, सिद्धेश शिरसाट आणि गणेश नार्वेकर यांना काही दिवसांपूर्वीच जामिनावर मुक्त करण्यात आले होते. आता गौरव वराडकरलाही सशर्त जामीन मिळाल्याने या प्रकरणातील जामिनावर सुटका झालेल्या आरोपींची संख्या वाढली आहे.