सावंतवाडीत गांजा विक्री करणाऱ्या युवकाला अटक

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका १९ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. विशाल विश्वनाथ वडार (१९, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मंगळवारी (२२ जुलै २०२५) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बाहेरचावाडा येथील एका बंद घराबाहेर करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, बाहेरचावाडा येथील जंगलमय परिसरात एका बंद घराबाहेर एक युवक गांजा विक्रीसाठी उभा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या परिसरावर करडी नजर ठेवली होती.

पोलिसांनी संशयित विशाल वडार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याजवळ ६० ग्रॅम वजनाच्या गांजासदृश पदार्थाच्या पुड्या आढळून आल्या. या पुड्यांची किंमत अंदाजे साडेतीन हजार रुपये आहे. चौकशीदरम्यान, विशालने या पुड्या विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आणि त्याच्याकडून गांजाच्या पुड्या, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, पोलीस हवालदार प्रकाश कदम, पोलीस हवालदार सदानंद राणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे यांचा समावेश होता.


विशाल विश्वनाथ वडार याच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गांजा प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून यामागे आणखी कोण सामील आहे, याचा छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!