माहिती अधिकार कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन
सावंतवाडी : कुडाळ पोलिसांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यातून माहिती अधिकारात मागवलेल्या पोलीस निरीक्षकांच्या डायरीसंदर्भातील कार्यवाहीचे पत्र सावंतवाडी उपविभागीय पोलीस कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे कुडाळ पोलिसांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात हे पत्र उपविभागीय कार्यालयाला प्राप्तच झाले नसल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार वरिष्ठांची जाणूनबुजून दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करत, बरेगार यांनी मंगळवारी सायंकाळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
बरेगार यांच्या मते, कुडाळ पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेल्या आवरणपत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की, ६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचा अहवाल ३ मे, २०२५ रोजी प्राप्त झाला असून त्याची प्रत उपविभागीय कार्यालयाला सादर केली आहे. परंतु, जेव्हा बरेगार यांनी उपविभागीय कार्यालयाकडे याच माहितीची मागणी केली, तेव्हा त्यांना असे कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. ही कृती म्हणजे राज्य माहिती आयुक्ताकडील अहवाल उपविभागीय कार्यालयास न पाठवता तो पाठवला असल्याचे भासवून केलेली फसवणूक आहे, असा बरेगार यांचा दावा आहे.
या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या बरेगार यांनी मागणी केली आहे की, ६ ऑक्टोबर, २०२४ ते ३ मे, २०२५ या कालावधीत राज्य माहिती आयुक्ताकडील अहवाल दडपून ठेवणाऱ्या तसेच वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय नागरी सुरक्षा संविधान २०२३ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून विभागीय चौकशीची शिफारस करावी. तसेच, तत्कालीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बरेगार यांनी व्यक्त केला आहे.