गटनेते मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कुडाळ : नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सात नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला या सात नगरसेवकांनी स्वेच्छेने महाविकास आघाडीचा गट सोडला त्यामुळे महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी या सात नगरसेवकांना अनहर्ता कायद्यानुसार अपात्र करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक झाल्यावर शिवसेनेचे सात व काँग्रेसचे दोन नगरसेवक मिळून त्यांनी कुडाळ महाविकास आघाडी या नावाने गट स्थापन केला आणि त्याला ११ फेब्रुवारी २०२२ रोजी राजपत्रामध्ये मान्यता देण्यात आली. या गटामध्ये गटनेता म्हणून मंदार शिरसाट तसेच किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, आफरीन करोल, अक्षता खटावकर या होत्या दरम्यान यापैकी सात जणांनी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ओरोस येथे भाजप पक्षात प्रवेश केला तसेच त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विकासासाठी आम्ही पक्षप्रवेश भाजपात केल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. उबाठा शिवसेना व काँग्रेसच्या या सात नगरसेवकांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा स्वेच्छेने होता. दरम्यान उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आपल्या लेटरहेडवर सभेचे निमंत्रण देऊन गटनेता बदलण्यासंदर्भात विषय ठेवला होता मात्र या सात जणांनी स्वेच्छेने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते या गटामध्ये नसताना या सभेचे निमंत्रण दिले. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता कायदा १९८६ चे कलम ३ (१) प्रमाणे किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, अफरिन करोल, अक्षता खटावकर या सात नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी गटनेता मंदार शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.