कुडाळमध्ये घरफोडी

अज्ञात चोरट्याने २२,९०० रुपयांचा ऐवज लंपास केला

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेरसेबांबर्डे माळवाडी येथील शिरीष गुणवंत सावंत यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे २२,९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सावंत कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. कुडाळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (७ जुलै २०२५) सकाळी शिरीष सावंत यांचे शेजारी लक्ष्मण दशरथ सावंत (वय ३८, रा. तेरसेबांबर्डे माळवाडी, कुडाळ) यांना शिरीष सावंत यांच्या घराची खिडकी उचकटलेली दिसली. त्यांनी तातडीने पाहणी केली असता, घराच्या दोन्ही खिडक्यांचे ग्रील काढलेले होते. तसेच, मागील दरवाजाची कडी कटवणीसारख्या हत्याराने कापल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील टीव्ही, २ एचपीचे दोन गॅस सिलिंडर, सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन, ग्रासकटर, स्टँड फॅन, टेबल फॅन आणि एक टेबल असा एकूण २२,९०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याला पकडण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!