सांगली येथील दोघांना सावंतवाडीतून अटक
सावंतवाडी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात घडलेल्या बहादूर देसाई (५४) या मजुराच्या खून प्रकरणी सावंतवाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर आणि अश्फाक खान इकबालखान पठाण (दोघे रा. मिरज, जि. सांगली) यांचा समावेश आहे. मिरज येथील बहादूर देसाई यांचा खून करून संशयित आरोपींनी पळ काढला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. देसाई हे गावात एकटेच राहत असल्याने त्यांना मारहाण करण्यामागचे कारण अस्पष्ट होते. पोलिसांनी देसाई यांची कोणाशी दुश्मनी होती का? याचा शोध घेत तपास सुरू केला.
या तपासात संशयित इब्राहिम इंसाफ मुजावर हा घटनेनंतर गावातून पसार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने रातोरात सावंतवाडी गाठली. गुरुवारी रात्री सावंतवाडीत आल्यानंतर तो आपल्या ओळखीच्या मित्रांकडे सबनीसवाडा येथे आला. तेथे एका इमारतीचे रंगकाम सुरू असून, या इमारतीवर तो रंगकाम करत होता. त्याने अश्फाक पठाण यांच्या मोबाईलवरून मिरज येथे संपर्क साधल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली. मिरज पोलिसांनी तात्काळ सिंधुदुर्ग पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी मिरज पोलिसांच्या लोकेशननुसार सबनीसवाडा येथील त्या इमारतीकडे जात संशयिताची चौकशी केली. चौकशीदरम्यान इब्राहिम इंसाफ मुजावर याने आपण रात्रीच सावंतवाडीत आलो असून, गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. अश्फाक पठाण यांच्या मोबाईलवरून संपर्क साधल्याने पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. या दोघांना सायंकाळी उशिरा मिरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.