संतोष हिवाळेकर / पोईप
(वार्ताहर) – प्रिपेड वीज मीटरमुळे वाढीव वीज बिले आल्याने संतप्त बनलेल्या पोईप खालची पालव वाडी – बेलाची वाडी येथील ग्रामस्थांनी जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मसदे विरण येथील वीज कार्यालयात धडक देत अभियांत्यांना जाब विचारला. ग्राहकांना सांगितल्या शिवाय नवीन प्रिपेड वीज मीटर बसविले जात असून या मीटरमुळे अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिले आली असल्याने ही बिले बदलून मिळावीत, तसेच लोकांची खात्री पाटल्याशिवाय मीटर बदलू नयेत ,अशी मागणी यावेळी अनिल कांदळकर व ग्रामस्थांनी केली.
यावेळी अनिल कांदळकर यांच्यासह बाबू परब, सुभाष परब, प्रकाश पालव, धनश्री संजय पालव, नामदेव पालव, गोविंद पालव, सत्यवान पालव उपस्थित होते. तर वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रमोद मारबते व लाईनमन महेंद्र घाडी उपस्थित होते.
काही वीज ग्राहकांचे वीज मीटर सांगितल्या शिवाय बदलून त्याजागी नवे प्रिपेड मीटर लावले गेले. नादुरुस्त मीटर बदलले गेल्यास हरकत नाही, मात्र, सुस्थितीत असलेले मीटर बदलून प्रिपेड मीटर का लावले गेले ? यामध्ये काही ग्राहकांच्या प्रिपेड मीटरची वाढीव वीज बिले आली आहेत. ही विजे बिले कमी करून मिळावीत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. प्रिपेड मीटर बसविण्याबाबत वीज कंपनीकडून ग्रामस्थांना समुपदेशन करण्यात यावे, ग्राहकांची प्रिपेड मीटर बाबत खात्री पटल्याशिवाय मीटर बदलू नयेत, तसेच सांगितल्याशिवाय कोणाचेही मीटर बदलू नयेत, असे यावेळी अनिल कांदळकर यांनी वीज अभियंत्यांना सांगितले.


Subscribe









