मृतदेहाजवळ दोन छत्र्या; मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
पाण्यात बुडून मृत्यू, पण पाणी कमी; सोनाली गावडे प्रकरणाला नवे वळण
गूढ वाढले, पोलिसांसमोर मोठे आव्हान!
बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. सोनालीचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, तेथे पोलिसांना तपासादरम्यान तिचा मोबाईल आणि दोन छत्र्या सापडल्या आहेत. यापैकी एक छत्री तिची असल्याचे निश्चित झाले असले तरी, दुसरी छत्री कोणाची, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तू आणि संशयाचे ढग
मंगळवारी (ता. ८) सकाळी कामावर जाते असे सांगून नेहमीप्रमाणे घरातून निघालेली सोनाली सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊन रात्री उशिरा बांदा पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास तिचा मृतदेह घराशेजारील ओढ्यात मृतावस्थेत आढळून आला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतर डॉ. गजानन सारंग यांनी दिलेल्या अहवालानुसार, सोनालीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले आहे. मात्र, तिचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, तेथे अवघे दोन फूट पाणी असताना तिचा पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
आज बांदा पोलीस सहायक निरीक्षक गजेंद्र पालवे आपल्या सहकाऱ्यांसमवेत इन्सुली येथे जाऊन गावडे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, ज्या ठिकाणी सोनालीचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी जाऊन आजूबाजूला पाहणी केली असता, मृतदेहापासून काही अंतरावर तिचा मोबाईल आणि एक छत्री आढळून आली. याशिवाय, तिच्या मृतदेहाजवळ आणखी एक छत्री सापडली. कुटुंबियांनी पाहिले असता, त्यातील एक छत्री सोनालीची असल्याचे स्पष्ट झाले, मात्र दुसरी छत्री कोणाची, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर ही आत्महत्या असेल, तर ती बॅग लावून आत्महत्या का करेल, असा प्रश्नही पोलिसांना आणि तिच्या कुटुंबीयांना सतावत आहे.
सीडीआर तपासणार, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
सोनालीचा मोबाईल सकाळपासूनच बंद असल्याने, ती सकाळपासूनच बेपत्ता असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून, तिचे शेवटचे बोलणे कोणाशी झाले, रोजच्या नंबरव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या नंबरवरून तिला कॉल आला होता का, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे तिच्या मोबाईलचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) मिळाल्यावर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे अधिक सोपे होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
बांदा पोलिसांनी सोनाली महामार्गावर ज्या ठिकाणी उभी राहत असे, त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, ती येण्या-जाण्याच्या वेळेत रस्त्यावर आली नसल्याचे दिसत आहे. तसेच, त्या मार्गावर दुसरे कोणीही गेले असल्याचे फुटेजमध्ये दिसत नाही. मात्र, घरातून निघून गेल्यावर ती तिच्या शेजाऱ्याला भेटल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
सोनाली ज्या ‘साऊथ कोकण डिस्टलरीज’ कंपनीत कामाला जात होती, त्या कंपनीत जाऊन पोलिसांनी तिचे कोणाशी भांडण झाले होते का, याची चौकशी केली. तिच्यासोबत येणाऱ्या मैत्रिणींचेही जबाब घेण्यात आले असून, त्यांचे म्हणणे आहे की सोनालीचे कोणाशीही भांडण नव्हते. ज्या गाडीतून ती कामाला जायची, त्या वाहन चालकांचाही जबाब घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, त्या दिवशी सोनाली नेहमीच्या वेळेवर न आल्याने त्यांनी तिला फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. त्यामुळे ती शेतीच्या कामासाठी घरी थांबली असेल, असा त्यांचा समज झाल्याने ते निघून गेले.
सध्या बांदा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, दुसरी छत्री कोणाची आणि सोनालीचा मृत्यू नेमका कसा झाला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.