कुडाळ : कुडाळ आंबेडकर नगर येथील रामचंद्र हनुमंत राऊळ (४२, रा. कुडाळ आंबेडकरनगर) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ व बहिणीमध्ये जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होते. बहिणीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवित असल्याची रामचंद्र राऊळ यांनी लिहिलेली चिठ्ठी यावेळी घरात सापडली. तसेच भाऊ व बहिणीमध्ये जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होते, असे रामचंद्र यांची पत्नी संजना रामचंद्र राऊळ (रा. कुडाळ- आंबेडकरनगर) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बहीण पूजा योगेश गावडे (३९, रा. माड्याचीवाडी-कुडाळ) हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सायंकाळी भारतीय न्याय संहिता २०२३/१०८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. घरातील एका स्टँडवर चिठ्ठी आढळली. त्यात बहीण पूजा हिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस बहीण पूजा कारणीभूत आहे, असे रामचंद्र राऊळ यांनी लिहिलेले आढळले. संजना यांनी चिठ्ठीची खात्री केली असता, चिठ्ठीवरील अक्षर व सही पती रामचंद्र यांचीच असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा गावडे हिच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच तिला अटक केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हवे करीत आहेत.