मांडकुली येथे शाळेमध्ये चोरी

प्रार्थना हॉलमधून ११,७०० रुपयांचे शालेय साहित्य लंपास

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या प्रार्थना हॉलचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ११,७०० रुपयांचे शालेय साहित्य लंपास केले आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे ही चोरी सोमवारी सकाळी उघडकीस आली.


मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळा भरल्यावर परिपाठासाठी शाळेच्या शिक्षणसेविका सौ. सुप्रिया वाघमारे या प्रार्थना हॉलमधील माईक आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना माईक जागेवर दिसला नाही. त्यांनी इतर साहित्याची तपासणी केली असता, कॅनन कंपनीचा कलर प्रिंटर, पितळेची समई, वायरसह दोन माईक, साउंड मशीन आणि भिंतीवरील घड्याळ हे साहित्यही गायब असल्याचे निदर्शनास आले.


शाळेच्या प्रार्थमा हॉलच्या मागील बाजूचा, आतून कुलूप लावलेला लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले. चोरीस गेलेल्या साहित्यात ८,००० रुपये किमतीचा कॅनन कंपनीचा कलर प्रिंटर, १०० रुपये किमतीची दीड फूट उंचीची समई, १,००० रुपये किमतीचे अहुजा कंपनीचे वायरसह दोन माईक, २,५०० रुपये किमतीचे अहुजाचे साउंड सिस्टिम आणि १०० रुपये किमतीचे भिंतीवरील घड्याळ अशा एकूण ११,७०० रुपये किमतीच्या वस्तूंचा समावेश आहे.


शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुयोग मारुती धमापुरकर यांनी तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात या चोरीची माहिती दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव मॅडम या घटनेचा अधिक तपास करत आहेत. शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून चोरट्यांना लवकर पकडण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!