कुडाळ पोलीस ॲक्शन मोडवर

चेंदवन – कुडाळ येथील युवक सिद्धिविनायक बिडवलकर गायब प्रकरण चौकशीला वेग….

सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर गायब झाला की,त्याला गायब करण्यात आले?

मुळ चेंदवन तालुका- कुडाळ येथे राहणारा प्रकाश उर्फ सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या युवकावर कुडाळ न्यायालयाचे वॉरंट बजावणीसाठी मागील दोन वर्षापासून कुडाळ पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो कुठेच आढळून येत नव्हता. पोलिसांसह त्याचे नातेवाईकही त्याचा शोध घेत आहेत. मात्र कुडाळ येथील एका बार व रेस्टॉरंट मध्ये काम करणारा प्रकाश उर्फ सिद्धिविनायक बिडवलकर ( वय 36) हा २५ मार्च 2023 पासून अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर तो लोकांना कधीही दिसलेला नाही.

सिद्धिविनायक बिडवलकर हा ज्या बार व रेस्टॉरंट मध्ये काम करत होता त्या ठिकाणी अनधिकृत दारू व्यवसाय करणार्‍या लोकांच्या संपर्कात होता त्यातूनच त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याप्रमाणे चार गुन्हे नोंद झाले होते. बिडवलकर हा ७ डिसेंबर 2022 रोजी शेवटचा कुडाळ न्यायालयात हजर होता. त्यानंतर 22 मार्च 2023 रोजी तो गुढीपाडव्याला आपल्या चेंदवन येथील घरी गेला होता. त्याचदरम्यानच्या कालावधीत गावातील लोकांनी सिद्धिविनायक बिडवलकर यास काही लोक चार चाकी गाडीत घालून घेऊन गेल्याचे त्यास शेवटचे बघितले असे सांगतात.त्यानंतर सिद्धिविनायक बिडवलकर हा कधीच कोणाला दिसला नाही. सिद्धिविनायक हा एकुलता एक होता त्याच्या वडिलांचे निधन तो लहान असताना झाले होते .तो आपली मूकबधिर आई व मूकबधिर मावशी हीच्यासोबत चेदवन मध्ये राहत होता. त्याच्या आईचे निधनही 2022 मध्ये झाल्याने तो मूकबधिर मावशी हीच्यासोबत राहत होता.

सिद्धिविनायक बिडवलकर याचे जवळचे नातेवाईक नसल्याने त्याची बेपत्ता होण्याची तक्रार कोणीही आजपर्यंत दिली नव्हती. दरम्यान दोन आठवड्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते ॲड .किशोर वरक यांनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना भेटून सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता प्रकरणाचे चौकशीची मागणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी कुडाळ पोलिसांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कुडाळ पोलीस ॲक्शन मोडवर आले असून बेपत्ता प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.सिद्धिविनायक बिडवलकर यास कुडाळ कोर्टाकडून गेल्या दोन वर्षात अनेक वेळा वॉरंट काढण्यात आले मात्र त्याची कधीच बजावणी झालेली नाही. याविषयी त्याच्या गावात चौकशी केली असता सिद्धिविनायक बिडवलकर याला अनधिकृत दारू व्यवसायातील लोकांनीच गायब केल्याची कुजबूज आहे. दरम्यान मागील आठवड्याभरात कुडाळ पोलिसांनी काही लोकांचे जाब जबाब नोंदवले असून सिद्धिविनायक बिडवलकर याची मूकबधिर असणारी मावशी तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. याविषयी कुडाळ पोलिसांकडे चौकशी केली असता सदर सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर बेपत्ता प्रकरणात लवकरच पोलीस ठोस कारवाई करतील असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता प्रकरणास वाचा फोडणारे ॲड किशोर वरक यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे तसेच पुढील 15 दिवसांत पोलिसांचा तपास बघून गरज वाटल्यास यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!