देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी रात्री गिर्ये, देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, देवगड हे नियमित गस्त घालत असताना, श्रीमती सुनंदा सदानंद तारी यांच्या मालकीची अश्विनी (नोंदणी क्रमांक – IND-MH-५-MM-६४६) नावाची नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात अनधिकृत एल.ई.डी. लाईटच्या सहाय्याने मासेमारी करताना आढळून आली. सदर नौका गिर्ये समुद्रकिनाऱ्याच्या अंदाजे ०९ सागरी मैल आत पकडण्यात आली. ही कारवाई रात्री ०१:२७ वाजता करण्यात आली.
नौकेवर नौका तांडेलसह तीन खलाशी उपस्थित होते. खलाश्यांच्या माहितीनुसार, सदर नौका श्री. हनिफ बशिर मेमन, राहणार देवगड यांनी भाडेकरारावर चालविण्यास घेतली होती. नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आली आहे. नौकेवरील मासळी साठा आढळून आलेला नाही. नौकेवरील एल.ई.डी. लाईट व संबंधित उपकरणे जप्त करून देवगड परवाना अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे लाईट, जनरेटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. नौकेस अंदाजे ५ लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे, पोलिस कर्मचारी श्री. पाटोळे, तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक, मालवण व देवगड यांच्या सहकार्याने करण्यात आली. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी सदर घटनेचे प्रतिवेदन दाखल केले असून, नौकेबाबतची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.













