कणकवली : वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलनजीक पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीचे अडविलेले पाणी बुधवारी सायंकाळी अचानक ‘डायव्हर्ट’ केलेल्या रस्त्यावर आले. बंधारा बांधून अडविलेले पाणी बंधारा फुटल्याने अचानक रस्त्यालगत आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे तेथील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मोठ्या गाड्यांना अन्य मार्गावरून वळविण्यात आले होते. हा प्रकार बुधवारी रात्री ८ वा. च्या सुमारास घडला.
वरवडे येथील पुलाचे काम सुरू असल्याने तेथील वाहतूक पुलाच्या खालील बाजूने ‘डायव्हर्ट’ करण्यात आली आहे. या कच्च्या रस्त्यावरून ही वाहतूक सध्या सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीचे पाणी या ‘डायव्हर्ट’ केलेल्या रस्त्याच्या काही अंतरावर बंधारा बांधून अडवून ठेवण्यात आले होते. मात्र, बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा बंधारा फुटल्याने पाण्याचा लोट पुढे ‘डायव्हर्ट’ केलेल्या रस्त्याच्या लेव्हलपर्यंत आला. या कच्च्या रस्त्याला केवळ एकच छोट्या पाईपचा मार्ग असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी हे पाणी रस्त्याच्या लेव्हलपर्यंत आले होते. कच्चा रस्ता असल्याने रस्त्याचा भरावदेखील कोसळण्याची शक्यता होती. त्यात चार चाकी वाहने गेल्यास भराव आणखी कोसळला जाऊन गंभीर हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे केवळ दुचाकी वाहतूक या कच्च्या रस्त्यावरून सुरू होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली.













