चालक बालंबाल बचावला
गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचा आंबोली घाटात ताबा सुटल्याने टेम्पो दहा फूट खोल दरीत कोसळून टेम्पोने पेट घेतला. चालक सौदागर धोंडीबा वाघ (२९, रा. धाराशिव) याने प्रसंगावधान दाखवत वेळीच टेम्पोतून बाहेर उडी मारल्याने तो बालंबाल बचावला. त्यानेच पोलिसांना अपघाताची खबर दिली. सदर अपघात रविवारी पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरकडे स्टीलची भांडी घेऊन आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे ६६९१) आंबोली घाटात आला असता मुख्य धबधब्यानजीक चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटला. आणि कठडा तोडून टेम्पो सुमारे १० फूट खोल दरीत कोसळला व टेम्पोने पेट घेतला चालकाने प्रसंगावधान राखत टेम्पोतून खाली उडी मारली. त्यामुळे या भीषण अपघातातून तो बचावला. त्यानेच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व चालकाला दरीतून बाहेर काढले. सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार दीपक शिंदे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून चालक सौदागर वाघ याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.