सावंतवाडी : आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय ॲड. अनिल निरवडेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव करत उपनगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. या निवडीमुळे सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ही निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी महायुतीमधील दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरवले होते. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत ॲड. अनिल निरवडेकर यांना १२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अजय गोंदावळे यांना ७ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी कोणालाही पाठिंबा न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. विरोधकांच्या या भूमिकेचा फायदा भाजपला झाला.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांनी दिली.


Subscribe









