सावंतवाडी : शहरातील बाहेरचा वाडा येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रफिक जाकीर नाईक याच्या घराच्या गच्चीवरील खोलीत जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत एपीआय जयेश खंदरकर, एएसआय बाळू सावळ तसेच हवालदार महेश जाधव, मनोज राऊत, मयूर सावंत आणि हनुमंत धोत्रे यांनी सहभाग घेतला. छाप्यादरम्यान जुगार खेळत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून २७,५०० रुपये रोख रक्कम, ३ मोटरसायकली आणि १३ मोबाईल फोन असा सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.