एकाचा जागीच मृत्यू
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डेब्राम्हणवाडी बॉक्सवेल वर दुचाकीला अपघात झाला. यात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सूर्यकुमार पांडे हे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मुंबईवरून गोव्याच्या दिशेने टीव्हीएस स्पोर्टस मोटारसायकल वरुन सुर्यकुमार पांडे (वय २४, सध्या रा. नवी मुंबई तुर्भे वाशी. मूळ उत्तर प्रदेश) आणि अनिस शर्मा (वय २१, सध्या रा. जुईनगर सेक्टर नवी मुंबई, मूळ रा. बिहार) हे दोघे पर्यटनासाठी जात होते. कासार्डे ब्राम्हणवाडी बॉक्सवेल पूलावर आले असता मोटारसायकल चालक सुर्यकुमार पांडे याला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर त्याची मोटरसायकल पूलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात पांडे याचे डोके संरक्षक कठड्यावर आदळल्याने त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत होत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यावर तो जागीच मुत्यूमुखी पडला. तर मागे बसलेला अनिस शर्मा याला किरकोळ दुखापत झाली.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी मदतकार्य करत १०८ रुग्णवाहीकेने दोघांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यात जखमी शर्मा याच्यावर उपचार करण्यात आले तर मृत पांडे याच्या नातेवाईकाना संपर्क साधत त्याचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला. महिंद्रा कंपनीत कामाला असणारे हे दोन युवक येथे पर्यटनासाठी जात होते.













