सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वस्त्रधुलाईच्या नावाखाली “काळाबाजार”

सप्टेंबर 2025 रोजी खरेदी केलेल्या वॉशिंग मशिन्सवर दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे अडीज लाखांचा खर्च?

आरोग्य शिबिरात फुलांच्या सजावटीचा थाट म्हणजे जिल्हावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार..!

प्रसाद गावडेंची खरमरीत टिका

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य सेवेच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार व आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा अनेक प्रकरणांमधून उघड झालेला असून निव्वळ तो झाकण्यासाठी “आरोग्य शिबिरांच्या मलमपट्टी”द्वारे जिल्हावासियांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार प्रभारी अधिष्ठातांकडून जोरात चालू आहे. याहून खेदाची बाब म्हणजे आरोग्य शिबिरांना फुलांची सजावट करून देखाव्याचा थाट करणे म्हणजे सुसज्ज आरोग्य सेवेस निष्क्रिय ठरल्यानंतर डीनकडून जिल्हासावासियांच्या जखमेवर जळजळीत मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. खरंतर नियमित ओपीडी मध्ये होण्यासाठी बंधनकारक असणाऱ्या तपासण्या आरोग्य शिबीरे घेऊन कराव्या लागतात याचाच अर्थ हॉस्पिटलच्या पॅनलवरील तज्ञ डॉक्टर ओपीडी करिता नागरिकांसाठी उपलब्ध नसतात हेचं सिद्ध केल्यासारखे नाही का असा सवाल गावडेंनी उपस्थित करत रुग्णालयाकडून आयोजित आरोग्य शिबिरांचा जणू फुगाच फोडला आहे.

रुग्णालयात वस्त्रधुलाई साठी आउटसोर्स पद्धतीने बाह्यस्त कंपनीची सेवा कार्यान्वित असताना प्रभारी अधिष्ठातांनी 20 लाख रुपये निधी अनाठायी खर्च करून वॉशर एकट्रॅक्टर व फ्लॅट वर्क आर्यनिंग मशिन्स माहे सप्टेंबर 2025 अखेर खरेदी केल्या. मात्र जुलै 2026 म्हणजेच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्या मशीन्सवर अडीज लाख रुपये देखभाल दुरुस्तीचा खर्च दाखवून निधी लाटण्याचा गंभीर प्रकार उघडकीस झाला आहे.एकीकडे टक्केवारीसाठी अनावश्यक वस्त्र धुलाईसाठी मशीनची खरेदी केली जाते तर दुसरीकडे त्याच मशीनचा वॉरंटी कालावधी चालू असताना दुरुस्तीसाठी निधी खर्च केला जातोय असा गंभीर आरोप गावडेंनी केला असून निव्वळ भ्रष्ट कारभार लपवण्यासाठी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यासाठी करण्यासाठी आरोग्य शिबिरांचे व्यासपीठ फुलांनी सजावट करून लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न झाला असल्याची खोचक टीका सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडील काळाबाजार यापूर्वी अनेक उदाहरणांमधून जिल्हावासीयां समोर उघड होऊन देखील भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले जातं असल्यानेच जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था पार कोलमडून पडली आहे, याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी डोळसपणे पहाणे आवश्यक असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!