वाळूच्या डंपरने शालेय विद्यार्थिनीला चिरडले

मुलीचा जागीच मृत्यू

कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी ६-३० च्या सुमारास घडली. मनस्वी सुरेश मेतर (राहणार निवती) असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता दहावीत शिकत होती.मनस्वी क्लाससाठी दुचाकीवरून पाट येथे जात असताना हा अपघात झाला. तीव्र अशा वळणाचा दुचाकीस्वाराला अंदाज न असल्याने दुचाकीची धडक डंपरला बसली. यात दुचाकीच्या मागे बसलेल्या मनस्वीचा मृत्यू झाला.

कुडाळ,पाट, परुळे,चिपी,मालवण या मार्गावर मागील अनेक वर्षे भरधाव डंपर धावत आहेत. या डंपरमधून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असते. तसेच हे डंपर बऱ्याचदा भरधाव असल्याने अन्य वाहनांना यांचा त्रास सहन करावा लागतो. मालवण, देवली, कर्ली खाडी या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन हे भरधाव डंपर गोवा, बेळगाव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जात असतात. आजपर्यंत कुडाळ ते पाट-परुळे या मार्गावर या डंपरचे अनेक अपघात झाले आहेत. तर या अपघातांमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले असून काही जायबंदी सुद्धा झाले आहेत. याबाबत अनेकदा पोलीस प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र, यावर योग्य अशी कारवाई आजतागायत झालेली नाही. केवळ तात्पुरती कारवाई या भरधाव डंपरवर करण्यात येते. त्यामुळे पाट तिठा येथे घडलेला अपघात हा कोणाच्या चुकीमुळे घडला ? याचे तर्कवितर्क लावण्यापेक्षा या भरधाव डंपरवरही कारवाई झाली पाहिजे.

तसेच एकंदरीत पाट तिठा येथे झालेल्या अपघात लक्षात घेता दुचाकी चालविणारा अल्पवयीन तर त्यामागे बसलेली मुलगी सुद्धा अल्पवयीन होती. याबाबत ही घटना दुर्दैवी असली तरी या आताच्या पिढीतील तरुणांनी यातून धडा शिकणे गरजेचे आहे. प्रामुख्याने या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देण्यास सक्त मनाई करणे गरजेचे आहे. वाहन परवाना हा प्रामुख्याने 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस देण्यात येतो हा नियम कटाक्षाने पाळणे गरजेचे असून त्याखालील मुलांना चालवण्यास तसेच नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या मुलावर सुद्धा कडक दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!