कुडाळ : तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), या इसमाचा राहत्या घरातच रक्ताळलेल्या स्थितीत मृतदेह सापडून आला. तो घरात एकटाच राहत होता. त्याचा खून झाल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट होते. वाडीत त्याचे कोणाशीच पटत नव्हते. खूनाची घटना काल सायंकाळी घडल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम दाखल झाली आहे. गावात पोलिसांकडुन गुन्ह्याचा तपास सुरू असुन खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात दाटीवाटीने घरे असूनही कोणीच पोलीसांना काय घडले हे कळविले नाही. संदिपची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच्यावर मारहाण तसेच चोरी असे गुन्हे दाखल आहेत.