रिगल कॉलेजमध्ये रानभाज्यांच्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चव, सादरीकरण आणि पारंपरिकतेचा अनोखा संगम

कणकवली : पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कणकवलीच्या रिगल कॉलेजमध्ये नुकतीच एक आगळीवेगळी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन रानभाज्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ सादर केले, ज्यातून त्यांची कल्पनाशक्ती आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीबद्दलची जागरूकता दिसून आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन रिगल कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉलेजचे माजी विद्यार्थी, युवा उद्योजक आणि चिकन एक्स्प्रेस हॉटेलचे मालक श्री. अजय नांदोस्कर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रानभाज्यांचे आरोग्यदायी आणि सांस्कृतिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक विचारांचा वापर करून अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ बनवले. यामध्ये पेवग्याचे कबाब, अळूवडी, विविध रानभाज्यांची मिश्र भजी, ओव्याच्या पानांची भजी, बांबूची भजी, अळूचे विविध पदार्थ, रानभाजीने भरलेले रॅव्हिओली पास्ता आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ‘एकपणाचे आईस्क्रीम’ यांसारख्या पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांनी चव, आरोग्य आणि सादरीकरण या तिन्ही बाबतीत उपस्थितांना प्रभावित केले.

ही स्पर्धा केवळ एक पाककला स्पर्धा नसून, विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली. यातून त्यांना परंपरा जपणे, आरोग्याचे महत्त्व ओळखणे आणि नवनिर्मिती करणे याची सुंदर शिकवण मिळाली. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन २०२५-२६ च्या नियोजनामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका आणि प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

error: Content is protected !!