फुटलेली ती प्रश्नपत्रिका…
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली आहे. परीक्षेत पहिल्याच दिवशी मराठी भाषेचा पेपर होता. हा पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर आणि यवतमाळ जिल्हयातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या आल्या. त्यावर मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेली प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिका यांच्यात खूप फरक असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
यवतमाळ आणि जालना मधे फुटल्या होत्या प्रश्नपत्रिका
यवतमाळ येथे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून येते. या प्रकरणात दोषी व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटीची बातम्या वृत्तवाहिन्यांवर प्रसिध्द झाल्या आहेत. त्याअनुषंगाने मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केली असता दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून अन्य खाजगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली. तसेच काही हस्तलिखित मजकूराची पानेही आढळून आली. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे हस्तलिखितामध्ये आढळून आली. परंतु ही प्रश्नपत्रिका नाही. काही गैरप्रकार करण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व उत्तरे व्हायरल केल्याचे दिसून येते. या घटनेची गांभीर्याने नोंद घेवून जिल्हा प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी अहवाल मागवला आहे.


Subscribe










