वेताळ बांबर्डे कदमवाडी शाळेमध्ये कायम स्वरूपी शिक्षक मिळावा

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे कुडाळ सभापतींना निवेदन

दोन दिवसात कायम स्वरूपी शिक्षकाची व्यवस्था होईल; सभापतींचे आश्वासन

कुडाळ : वेताळ बांबर्डे कदमवाडी शाळेमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून प्रशालेमध्ये अवघे तीनच शिक्षक आहेत. त्यामुळे ३ शिक्षकांना मुलांवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील ग्रामस्थांनी याकडे सभापतींचे लक्ष वेधून प्रशालेला कायम स्वरूपी मिळण्यासाठी निवेदन दिले. तर येत्या दोन दिवसांत कायम स्वरूपी शिक्षकाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन सभापती मिलिंद नाईक यांनी दिले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे कदमवाडी या प्रशालेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ५१ एवढी आहे. या वर्गांसाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. तर सहावी व सातवीच्या वर्गांसाठी केवळ एक पदवीधर शिक्षक असून त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आहे. शिवाय प्रशालेमध्ये कातकरी समाजाचे ४० विद्यार्थी असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. या समस्येकडे शाळा व्यवस्थापन समिती वेताळ बांबर्डे कदमवाडी यांच्या माध्यमातून कुडाळ सभापतींचे लक्ष वेधले. तर येत्या दोन दिवसात कायम स्वरूपी शिक्षकाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी दिले.

यावेळी प्रदिप गावडे, शिवाजी कदम, सचिन भोगले, प्रकाश राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!