झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…

चहात माशी पडल्याचे झाले निमित्त…

सहा जणांवर गुन्हा दाखल…

कुडाळ :- तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. एका चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने सांगताच त्याचे रुपांतर वादावादीत होऊन हॉटेल मालकासह अन्य 5-6 जणांनी त्या पर्यटकाला दोरीने बांधून जोरदार मारहाण केली. आज सकाळी 6 वाजता हि घटना घडली. दरम्यान मारहाण करणाऱ्या सहा जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहिती नुसार, रुपेश बबन सपकाळ (वय-33 वर्षे रा. कात्रज, जिल्हा-पुणे) हे आपल्या मित्रांसह गोव्याला जात होते. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला ते झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबले. त्यावेळी एका चहाच्या कपात माशी पडलेली रुपेश सकपाळ यांना दिसली. त्यांनी ती बाब हॉटेल मालक तथा आरोपित क्रमांक 1 तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनाला आणली आणि चहा बदलून देण्यास सांगितले. पण चहा बदलून मिळाला नाही, त्यावेळी त्या चहाचे पैसे देणार नाही असे श्री. सपकाळ यांनी सांगताच तन्वीर शेख याला त्याचा राग येऊन त्याने आपल्या साथीदारांसह बेकायदा जमाव करून रुपेश बबन सपकाळ यांना दोरीने बांधून काठीने व हाताच्या ठोशांनी मारहाण केली. तसेच रुपेश सकपाळ यांच्या सोबत असलेल्या संजय सुदाम चव्हाण राहणार -पुणे यालाही मारहाण केली. रुपेश सकपाळ यांचे कपडे फाडले. त्यांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले.

दरम्यान पर्यटकांनी 112 नंबर वरून कुडाळ पोलीस ठाण्यात संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याना रुपेश सपकाळ हे दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांना कुडाळ येथे आणले. त्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश मुंढे यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली. त्यावरून मारहाण करणारे तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय-57), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय-18), श्रीम. परवीन शराफत शेख (वय-42), श्रीम. साजमीन शराफत शेख (वय-19) आणि तलाह करामत शेख (वय-26) (सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता-कुडाळ) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम -115(2),189(2),126(2), 191 (2) 190,118 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाडकर हे अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!