सिंधुदुर्गात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. अशातच पिंगुळी मतदारसंघाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत असून देखील एका अपक्ष उमेदवाराच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे पिंगुळी पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार कश्मिरा केतन शिरोडकर…
खरंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघातून कश्मिरा शिरोडकर यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी त्यांचे नाव डावलल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून रिक्षा या निवडणूक चिन्हावरून त्या निवडणूक लढवत आहेत. पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघात कश्मिरा शिरोडकर यांचा जोरदार प्रचार सुरू असून सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्ते, पाणी व स्ट्रीटलाईट यांच्या व्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण, मुलांचे उच्च शिक्षण आदी पैलूंवर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिंगुळी गावात सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून जागोजागी कचराकुंड्यांचे व्यवस्थापन करून कचऱ्याच्या समस्येपासून सर्वांना मुक्त करणार असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय शेती विषयक प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उद्युक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवक युवतींना तांत्रिक शिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिला सक्षम असेल तर समाज सक्षम होण्यास मदत होईल यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून त्यांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे.
कश्मिरा शिरोडकर यांच्या रुपात एक सुशिक्षित उमेदवार पिंगुळी पंचायत समिती मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून त्यांनी पिंगुळी ग्रामपंचायत मध्ये काम केले आहे. त्यामुळे प्रशासनाचा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. शिवाय त्यांचे पती केतन शिरोडकर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. पूरग्रस्तांना मदत करणे, आधार कार्डच्या शिबिराचे आयोजन करणे यांसारखी अनेक सामाजिक कार्य त्यांनी केली आहेत. शिवाय प्रत्येकाच्या कठीण प्रसंगात ते नेहमीच धाऊन जातात. त्यामुळे तळागाळातील लोकांशी त्यांचा चांगलाच संपर्क असून सर्वांशी त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत.
एकंदरीत प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी भेटी दिल्या असता चेडवा तू भिया नको, आमचो आशीर्वाद तुझ्या पाठीशी आसा असे स्वर घराघरांतून उमटू लागले आहेत. एकंदरीत कश्मिरा शिरोडकर यांचे व्हिजन, केतन शिरोडकर यांचा जनसंपर्क आणि वरील सर्व बाबींचा विचार करता कश्मिरा शिरोडकर यांची रिक्षा प्रचारामध्ये सुसाट धावत आहे एवढं मात्र नक्की…


Subscribe









