कुडाळ प्रतिनिधी: दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण अज्ञान रुपी अंधःकार दूर करून नव्या उमेदीचा, नव्या आशेचा, नव्या विचारांचा दिवा लावून आयुष्य उजळविण्याचा दिवस म्हणजे दिवाळी.
दिवाळीत भरपूर फराळ पाहुण्यांची येजा त्यांनी आणलेला खाऊ खाणे आणि मनसोक्त खेळणे,फटाके फोडणे,रांगोळी काढणे,आणि हसणे,बागडणे,हे सर्व म्हणजे बच्चे कंपनीची आनंदाची पर्वणीच जणू.
आणि या सर्वांचा आनंद अजून द्विगुणित करणारा म्हणजे किल्ले बनविण्याचा आनंद.
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन जसे किल्ली काबीज केलेत तसेच भव्य आणि भक्कम किल्ले त्यांनी बांधलेत सुद्धा.
आजचा युवा वर्ग ह्या किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण तर करतोच आहे पण ह्या किल्ल्याचा इतिहासही तेवढ्याच अभिमानाने सांगतो आहे.
संस्कृती जोपासतो आहे .दिवाळीत किल्ले बनविण्याचा एक रंजक आणि मनमोहक कार्यक्रम हा असतोच
लहान मुलं किल्ले बनविता बनविता महाराजांचा इतिहासही रेखाटताना दिसून येतात.
असाच साजिरा गोजिरा उपक्रम राबवला आपल्या वेताळ बांबार्डे गावातील मुलांनी.
वेताळ बांबार्डेत किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत बच्चे कंपनीने बनविलेले किल्ले हे मनाला आत्मिक समाधान देणारे तर आहेच.
पण त्याच सोबत महाराजांची आठवण,त्यांच्या शौर्याच्या गाथा पुन्हा स्मरून मनात आयुष्यातील कठीण प्रसंगाना तोंड देण्यासाठी बळ देणाऱ्या आहेत.