कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हिर्लोक भागात अघोरी
कृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नरबळीचा प्रकार असू शकतो. अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली आहे. या घटनेची आज माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतले आहे.
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात पाच-सहा महिन्यापासून एका घरात बाहेरच्या गावचे तीन-चार सदस्य ये-जा करत होते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सदर महिला मालवण तालुक्यातील धामापूर येथील असल्याचे चर्चा आहे. बाहेर गावातील या संशयित व्यक्ती त्या बंद घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत असत, विशेष म्हणजे त्या घरात संशयितांनी आठ फुटाचा खड्डाही खोलल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या ठिकाणी पूजेचे साहित्य, दोरे, बाहुली, लिंबू, अबीर, बुका, शेंदूर अशा वस्तू आढळून आल्या आहेत.
याबाबत स्थानिक ग्रामस्थांना संशय आल्याने काही सुज्ञ नागरिकांनी गावातील प्रमुख मंडळींना याची कल्पना दिली. त्यानंतर मंगळवारी याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती देण्यात आली. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या बंद घरात एका महिलेसह पाच सदस्य पूजाअर्चा करत असताना आढळून आल्याचे सांगण्यात आले. यावेळी पूजेच्या साहित्यासह संशयित तीन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कुडाळ पोलीस स्थानकात आणले. दरम्यान या घटनेची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्यामुळे प्रमुख पोलीस अधिकारी त्या गावात रात्री उशिरा भेट देण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत याबाबतचे कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. एकूणच या घटनेमुळे हिर्लोक गावात एकच खळबळ उडाली आहे