नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झालं आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महिन्याला साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेसाठी एकूण 46 हजार कोटी वर्षाकाठी लागणार होते. मात्र, योजना जुलै 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36 हजार कोटी लागणार होते. तशी तरतुद राज्य सरकारने केली आहे. यापैकी 17 हजार कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 19 हजार कोटी शिल्लक आहेत. आताच्या पुरवणी मागणीत 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पुर्ततेसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत 14 हजार कोटी रुपये लागणार आहेत.आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20 हजार 400 कोटी शिल्लक आहेत. 1400 कोटी रुपयांची तरतूद ही काही प्रशासकिय पुर्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणीसांठी केलेल्या 2100 रुपयांच्या घोषणे संदर्भात काहीच निर्णय अद्याप झाला नसल्याच यावरुन स्पष्ट होतंय.