अपघातात गंभीर जखमी झालेल्या वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ.

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने केली सुटका

उपचार व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वीकारत मोडलेल्या पायावर उपचार करून पुन्हा उभे केले.

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या गाईच्या वासरासाठी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अपघातानंतर कारखाली अडकलेल्या वासराची सुखरूप सुटका करण्यापासून ते त्याच्या उपचारांचा खर्च उचलून मोडलेल्या पायावर उपचार करून त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यापर्यंत गावडे यांनी या वासराची काळजी घेतली.

दिनांक 16 आगस्ट रोजी दुपारी घडली दुर्दैवी घटना

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान हिंदू कॉलनी परिसरात ही घटना घडली. शहरात फिरणाऱ्या गुरांपैकी एका गाईच्या वासराला स्विफ्ट कारची धडक बसली. या घटनेत वासरू कारच्या खाली अडकले आणि त्याचा पाय वाहनाच्या आतील भागात अडकल्याने परिस्थिती गंभीर झाली.

घटना लक्षात येताच परिसरातील जागरूक युवक आणि नागरिक मदतीसाठी धावून आले. वासराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा पाय अडकलेला असल्याने अत्यंत सावधपणे बचावकार्य करणे आवश्यक होते. त्यामुळे नागरिकांनी तातडीने शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

टोइंग व्हॅनसह अभिषेक गावडे घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अभिषेक गावडे यांनी तात्काळ टोइंग व्हॅनची व्यवस्था केली आणि आपल्या सहकाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी दाखल झाले. वाहन उचलल्याशिवाय वासराला सुरक्षितपणे बाहेर काढणे कठीण असल्याने टोइंग व्हॅनच्या मदतीने कार उचलण्यात आली.

स्थानिक नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अत्यंत काळजीपूर्वक वासराला कारखालून सुखरूप बाहेर काढले. वासराचा जीव वाचल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मात्र वासराला बाहेर काढल्यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. पाय मोडल्याचे लक्षात येताच वेळ न दवडता त्याला पशुवैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले आणि आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.

बचावकार्यापुरती मदत मर्यादित नाही, स्वखर्चाने वासराच्या पायाला प्लास्टर घालून त्याला उभे केले

अनेकदा अपघाताच्या क्षणी मदत केली जाते आणि त्यानंतर विषय मागे पडतो. मात्र या घटनेत अभिषेक गावडे यांनी वासराची सुटका झाल्यानंतरही त्याची साथ सोडली नाही. पुढील उपचार, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली.

वासराचा पाय गंभीररीत्या मोडलेला असल्याने पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. त्यानंतरही वासराची प्रकृती, उपचार आणि त्याच्या पायाची स्थिती याकडे सातत्याने लक्ष देण्यात आले.

सुमारे पंधरा दिवसांच्या उपचारांनंतर आता हे वासरू पुन्हा आपल्या पायावर उभे राहू लागले आहे. अपघाताच्या दिवशी कारखाली असहाय अवस्थेत अडकलेल्या वासरापासून ते उपचारानंतर उभ्या राहिलेल्या वासरापर्यंतचा हा प्रवास नागरिकांच्या संवेदनशीलतेचे आणि वेळेवर मिळालेल्या मदतीचे उदाहरण ठरला आहे.

आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून कोंडवाडा; समस्येवर कायमस्वरूपी तोडग्याच्या दिशेने पाऊल.

दरम्यान, कुडाळ शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांच्या सुरक्षिततेचा तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न केवळ तात्पुरत्या उपाययोजनांपुरता मर्यादित न ठेवता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

कुडाळ-मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात गुरांसाठी स्वतंत्र कोंडवाडा उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत नियोजनबद्ध पद्धतीने ही व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गावडे यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांवर गुरे फिरत असल्यामुळे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यातून वाहनचालकांसोबतच मुक्या जनावरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. हिंदू कॉलनीतील वासराच्या अपघातासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी केवळ अपघातानंतर मदत करण्यापेक्षा अशा घटना घडूच नयेत यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रस्तावित कोंडवाडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सहकाऱ्यांची मोलाची साथ

या संपूर्ण मदतकार्यामध्ये अभिषेक गावडे यांच्यासमवेत नगरसेवक विलास कुडाळकर, चेतन पडते, राजवीर पाटील, प्रथमेश केळबाईकर तसेच कुडाळ शहरातील अन्य युवा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!