३८ वर्षीय पर्यटकाची प्राणज्योत मालवली
धबधब्यावर आंघोळ करताना सर्पदंश
आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथे वर्षापर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील एका पर्यटकाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाधर मरिअप्पा कोरावार (वय ३८, रा. कमलापूर, विजयनगर, कर्नाटक) असे मृत पावलेल्या पर्यटकाचे नाव आहे. या घटनेमुळे आंबोलीतील पर्यटकांमध्ये तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर हे रविवारी आपल्या सहा मित्रांसोबत आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास आंबोलीतील मुख्य धबधब्यावर सर्व मित्र आंघोळीचा आनंद घेत असताना गंगाधर यांना अचानक विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे समजताच मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने डॉक्टरांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णवाहिकेतून सावंतवाडीला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. सध्या त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला असून, कर्नाटकातून नातेवाईक आल्यानंतर सोमवारी शवविच्छेदन केले जाईल. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

Subscribe










