कुडाळ येथे भरदिवसा चोरीचा प्रयत्न

चोरांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समोर

कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील साहित्य विस्कटलेले आढळले; मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, निवासी संकुलातील फ्लॅटधारक सकाळी फ्लॅट बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी परतल्यानंतर दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आल्याने त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, साहित्य विस्कटलेले दिसून आले. लागलीच त्यांनी याबाबतची कुडाळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. भर दिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!