सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या इन्सुलीतील तरूणाचा चिरेखाणीतील साचलेल्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. संजय लक्ष्मण गावंकर (वय ५०, रा. इन्सुली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सतीचिवाडी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय गावंकर हे माजगाव आणि इन्सुली येथील आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोलीत आले होते.
सतीचिवाडी परिसरातील एका चिरेखाणीजवळ गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. घटनेचे गांभीर्य ओळखून माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी तात्काळ ‘सह्याद्री अॅडव्हेंचर आंबोली’ व ‘सांगेली रेस्क्यू टीम’ला याबाबत पाचारण केले. माहिती मिळताच रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात शोधमोहीम हाती घेतली. रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर यांनी स्वतः खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या बचावकार्यात सह्याद्री अॅडव्हेंचर आंबोली व सांगेली रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे व विराज गावडे यांनी मोलाची मदत केली. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Subscribe










