
कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : वाघेरी-माळवाडी येथील एका ५५ वर्षीय महिलेने राहत्या घरी तणनाशक प्राशन केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीनल महेश पाटील असे मृत महिलेचे नाव असून, उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मीनल पाटील यांनी राहत्या घरी विषारी तणनाशक प्राशन केले. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरू असतानाच रविवारी सकाळी १०:२० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी मृत महिलेचे पती महेश मनोहर पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मीनल पाटील या गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर रत्नागिरी येथे उपचारही सुरू होते. मानसिक त्रासातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.
या घटनेची नोंद कणकवली पोलिसांत करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास सुरू आहे.



Subscribe









