महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत मांडल्या व्यापाऱ्यांच्या अडचणी
आठ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन
पिंगुळी : पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. अभिमन्यू राख यांची भेट घेऊन वीज समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पिंगुळीमध्ये वारंवार वीज जाण्यामुळे दुकानदारांचे व्यवसाय प्रभावित होत असून, विद्युत उपकरणे तसेच विविध कामांवर त्याचा परिणाम होत आहे. आगामी गणेश चतुर्थीसह धार्मिक सणांना सुरुवात होणार असल्याने व्यापारी वर्गाची लगबग सुरू आहे. तसेच अनेक बचत गटांकडून विविध वस्तू व सजावटीचे साहित्य तयार करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने कामाचा खोळंबा होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील म्हापसेकर आणि उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी पिंगुळीतील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.तसेंच उपाध्यक्ष दीपक गावडे पिंगुळीतील वीज कर्मचारी याची गणपती सणा असे पर्यंत कुठे बदली करू नये ही मागणी झोर लावून धरली.
व्यापाऱ्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंता वनमोरें साहेब व उपअभियंता निळकंठ साहेब यांनी संबंधित लाईनमनशी फोनवरून संपर्क साधत पिंगुळीतील वीजपुरवठ्याचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
गणेश चतुर्थीच्या सणकाळात व्यापारी व नागरिकांना वीजपुरवठ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तसेच पुढील आठ दिवसांत पिंगुळी गावातील वीजपुरवठ्याच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनेला दिले.
महावितरणच्या या आश्वासनामुळे पिंगुळीतील व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला असून, आठ दिवसांत प्रत्यक्षात समस्या कितपत दूर होते, याकडे आता पिंगुळीवासीयांचे लक्ष लागले आहे.यावेळी संजय वाळके, अनिकेत आंदुर्लेकर, संदीप करगुटकर,आबा मार्गी,बाळा खोत, बेस्ट बेकरीचे मालक अण्णा. केतन शिरोडकर उपस्थिती होते.


Subscribe










