युवा सैनिकांचा ‘आनंद’ – कट्टर राणे समर्थक आनंद शिरवलकर

वाढदिवस विशेष

सिंधुदुर्गच्या राजकारकात अनेक दिग्गज होऊन गेले. ज्यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आपलं नाव जिल्हावासियांच्या हृदयावर सुवर्णाक्षरामध्ये कोरलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे सौरमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण नारायण राणे यांच्या नावाभोवती फिरते. या सूर्य’नारायणाच्या’ तेजाने आजवर अनेक तारे प्रकाशित झाले. यातीलच एक युवतारा म्हणजे आनंद भास्कर शिरवलकर…

आनंद शिरवलकर यांचा जन्म २४ जुलै १९८० साली कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे या गावात झाला. वडील राज्य परिवहन मंडळामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासहित कुडाळ येथे राहावे लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारवाडी तर माध्यमिक शिक्षण कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ येथे झाले. पुढे २००६ साली संत राऊळ महाराज महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी शालेय जीवनातच राजकारणात प्रवेश केला. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय जीवनाची सुरुवात केली. २००५ साली माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर आनंद यांनी आपले काम अधिकच जोमाने सुरू ठेवले. पुढे २००९ साली निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी निलेश राणे यांच्या प्रचाराची धुरा आनंद यांनी आपल्या हातात घेतली. या निवडणुकीत निलेश राणे यांचा भरघोस मतांनी विजय झाला. पुढे निलेश राणेंनी आनंद शिरवलकर नावाच्या हिऱ्याची चमक पाहून कुडाळ युवक काँग्रेसच्या तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. युवकांसाठी असणारी तळमळ व इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्परता या त्यांच्या स्वभावामुळे ते अल्पावधीतच युवकांच्या मस्तकावरील किरीट बनले. तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्याकडून वेळोवेळी मिळणारी कौतुकाची थाप त्यांच्यासाठी एखाद्या ‘एनर्जी ड्रिंकप्रमाणे’ काम करत होती. या सगळ्याच्या जोरावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली.

पुढे २०१४ ते २०२४ हा काळ सर्वच राणे समर्थकांसाठी संघर्षाचा होता. या काळातच अनेकांनी राणे कुटुंबीयांची साथ सोडली. परंतु आनंद शिरवलकर सख्ख्या भावाप्रमाणे निलेश राणे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. पुढे २०२१ साली आनंद शिरवलकर यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता शिरवलकर यांची कुडाळ नगरपंचातीवर नगरसेविका म्हणून निवड झाली. सध्या त्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आहेत. कुडाळ शहराच्या विकासाची गाडी त्या वेगाने हाकत आहेत. आनंद शिरवलकर यांच्या निष्ठेची ही फलश्रुतीच म्हणावी लागेल…

आनंद शिरवलकर हे शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख आहेत. सौ. प्राजक्ता शिरवलकर आणि श्री. आनंद शिरवलकर दोघेही राजकारणामध्ये सक्रीय आहेत. श्री. शिरवलकर आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना ‘आनंद’ देण्याचं काम करत आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्यांना सौभाग्यवतीची खंबीर साथ लाभली आहे. श्री. आनंद शिरवलकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या राजकीय जीवनाचा आलेख नेहमी चढता राहो हीच श्री. देव वेतोबा आणि कुडाळेश्वर चरणी प्रार्थना…

error: Content is protected !!