आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
संजू परबांच्या हस्ते उद्घाटन; अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्या अनोख्या शुभेच्छा
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या नेत्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरादरम्यान उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे आणि प्राची राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. दीपक केसरकर हे अत्यंत सरळ, साधे आणि कधीही कोणाचे वाईट न चिंतणारे व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दांत त्यांनी केसरकरांचे कौतुक केले. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी जी अफाट कामे केली,
त्याचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही, असे सांगत केसरकर यांच्यासारखा आमदार या मतदारसंघाला मिळणे कठीण आहे, अशा भावना परब यांनी व्यक्त केल्या. तसेच त्यांना आगामी काळात मंत्रीपद मिळावे, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमात माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनीही आपली मनोगते व्यक्त करत केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या सामाजिक उपक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी आणि लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती. यामध्ये शहरप्रमुख बाबू कुडतरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, अॅड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर आणि बासीत पडवेकर उपस्थित होते. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, वसंत सावंत, अॅड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ आणि मेहर पडते यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.


Subscribe










