सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण व मराठी
भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात शिवसेना आणि दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
केसरकर यांनी मुंबई येथे आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला असला, तरी त्यांनी फोनवरून सावंतवाडीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकद असून माझे जीवन जनतेसाठी समर्पित आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यात शैक्षणिक साहित्य आणि वृक्षांचे वाटप करण्यात आले. युवा रक्तादाता संघटना व नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत झाला. यासोबतच महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय आणि अंकुर केंद्र येथे रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि शाळांमध्येही विविध विधायक कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच स्थानिक संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी केक कापून जल्लोषात आनंद साजरा केला.
या सामाजिक उपक्रमांचाच एक भाग म्हणून येत्या २० जुलैला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये २२ हून अधिक प्रकारच्या वैद्यकीय सेवा दिल्या जाणार असून, सुमारे १०० डॉक्टर उपस्थित राहून गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. तालुक्यातील जनतेने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, अशोक दळवी, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, नगरसेवक अजय गोंदावळे यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शहरप्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe










