पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आधाराचा हात
तळेरे : आईच्या शेवटच्या इच्छेचा मान राखण्यासाठी अवघ्या ११ वर्षांच्या कु. तन्वी संदीप चव्हाण हिने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देत धैर्य, कर्तव्य आणि मायेचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हळहळला असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
गेली चार वर्षे दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या आपल्या आईची सेवा, तिची काळजी आणि तिच्यासाठीचा संघर्ष तन्वीने लहान वयातही मोठ्या धैर्याने पेलला. आईच्या निधनानंतर तिच्या शेवटच्या इच्छेचा सन्मान राखत तिने अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. या घटनेने समाजमन सुन्न झाले.
या घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी तळेरे (वाघाचीवाडी) येथे जाऊन तन्वी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत तन्वीला धीर दिला आणि तिच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी त्यांनी, “तन्वी, तू एकटी नाहीस. तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,” असे सांगत तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या भेटीत एका लोकप्रतिनिधीपेक्षा एका संवेदनशील पालकाची माया आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून आली.
संकटाच्या प्रसंगी आधाराचे दोन शब्दही माणसाला जगण्याचे बळ देतात. पालकमंत्री नितेश राणे यांच्या या सांत्वनपर भेटीमुळे दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या तन्वीच्या कुटुंबाला मानसिक आधार मिळाला.
तन्वीच्या दिवंगत मातोश्रींच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो आणि तिला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच सर्वांची भावपूर्ण प्रार्थना.


Subscribe










