कै.सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिर
चित्रकला, पाककला स्पर्धांसह शहरातील विविध 14 विकास कामांची भूमिपूजन
कणकवली : कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे नेतृत्व गेल्या 20 ते 25 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत काम करत आहे. संदेश पारकर यांचा १४ जुलै रोजी वाढदिवस असल्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 500 रक्तदानाचा संकल्प , एक हजार वृक्ष वाटप, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतच्या विविध 14 विकासकामांची भूमिपूजने करण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष सुशांत नाईक,नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, संतोष पुजारे, दिवाकर मुरकर, निकीत मुरकर ,रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते.
१४ जुलै रोजी शहरात एक हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रक्त पिढीला आवश्यक असलेले महारक्तदान शिबिर आयोजित करुन 500 बॉटल रक्त या शिबिरात संकलित करण्यात येणार आहे. हे शिबीर माजी उपसरपंच सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच दहावी, बारावी व विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १३ जुलै रोजी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. चित्रकला स्पर्धा आणि रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम त्याच ठिकाणी होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहेत. उड्डाणपूलाखालील परिसराच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम, मराठा मंडळ येथील गणपती सान्याच्या परिसरातील सुशोभीकरण तसेच इतर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली.
कणकवलीत गेल्या महिन्यांत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ व सुंदर कणकवली तसेच आधुनिक कणकवलीचा संकल्प घेऊन अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोकाट जनावरांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांपैकी सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. नमो उद्यानासह विविध विकासकामे पूर्णत्वास जात असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत काम करत आहे, असे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी सांगितले.


Subscribe










