गणेश घाटाचे काम वार्ड क्र. ३ मध्ये सुरू आहे आणि हा वार्ड आपला म्हणण्यामागे स्वार्थ काय?
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांनी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आपल्या वार्डाची हद्द आधी समजून घ्या आणि त्यानंतरच विकासकामांबाबत सार्वजनिक वक्तव्ये करा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
संदेश सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भंगसाळ नदीवरील सार्वजनिक गणेश घाटाचे सुशोभीकरणाचे काम वार्ड क्रमांक ३ मध्ये सुरू आहे. असे असताना या कामावर स्वतःच्या वार्डाचा दावा करण्यामागे नेमका कोणता स्वार्थ आहे, हे संबंधित नगरसेविकांनी जनतेसमोर स्पष्ट करावे.
ते म्हणाले की, कुडाळ शहरातील सुमारे ९० टक्के घरगुती गणरायांचे विसर्जन भंगसाळ नदीवरील सार्वजनिक गणेश घाटावर केले जाते. त्यामुळे या घाटाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने प्रशासनाकडे याबाबत जाब विचारण्यात आला. त्यानंतर नगरसेविका नयना मांजरेकर यांनी केलेली प्रतिक्रिया वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सावंत यांनी पुढे म्हटले की, “गणेश घाटाचे काम पूर्णत्वास गेल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. पावसामुळे कामाची अवस्था काय झाली आहे, हे नागरिक पाहत आहेत. संबंधित नगरसेविकांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे.”
नगरसेविका नयना मांजरेकर या गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. इतका कालावधी उलटल्यानंतरही आपल्या वार्डाच्या सीमा आणि हद्दीबाबत त्यांना स्पष्ट माहिती नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते, असा आरोपही संदेश सावंत यांनी केला.
“एखाद्या लोकप्रतिनिधीला आपल्या प्रभागाची सीमा, रचना आणि हद्द यांची अचूक माहिती असणे ही किमान अपेक्षा असते. परंतु दुसऱ्या प्रभागातील विकासकामावर स्वतःचा दावा केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. विकासकामांचे श्रेय घेण्याच्या राजकारणापेक्षा वस्तुस्थिती तपासून जबाबदारीने बोलणे अधिक आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नयना मांजरेकर या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी असल्याचा उल्लेख करत, “आजपर्यंत पक्षासाठी त्यांनी नेमके कोणते योगदान दिले, हेही त्यांनी जनतेसमोर मांडावे,” असा सवाल उपस्थित केला.
शेवटी संदेश सावंत यांनी स्पष्ट केले की, “आमची कोणावरही वैयक्तिक टीका करण्याची भूमिका नाही. मात्र जनतेसमोर सत्य आणि वस्तुस्थिती मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. संबंधित नगरसेविकांनी नगरपंचायतीकडील अधिकृत प्रभाग नकाशा आणि प्रशासनाची माहिती तपासूनच सार्वजनिक वक्तव्ये करावीत, जेणेकरून नागरिकांची दिशाभूल होणार नाही.


Subscribe










