येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल

नगरसेविका नयना मांजरेकर यांची ग्वाही

कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार आहे. पर्यटन विभागाकडे असलेले घाटाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करून गणेश चतुर्थीपूर्वी लोकार्पण करण्याचे यापूर्वीच नियोजित आहे. त्यानुसार जलदगतीने ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे मुळात योजलेल्या व योग्य पद्धतीने पूर्णत्वास जात असलेल्या कामाबाबत अल्टीमेटम अथवा इशारा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मा. नगराध्यक्ष व कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल असा विश्वास नगरसेविका नयना मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.

दिनांक २९/१०/२०२५ रोजी गणेश घाट बांधकाम करणे या प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय आमदार श्री. निलेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यांनतर भंगसाळ नदीच्या पाण्याची पातळी साधारण नोव्हेंबर २०२५ अखेर खाली गेल्यांनतर प्रत्यक्ष कामास सुरवात ठेकेदारामार्फत करण्यात आली.

धरण कक्ष पाटबंधारे, उपविभाग सावंतवाडी यांच्याकडून संभाव्य पाणी टंचाई नियोजनाच्या दृष्टीने बंधा-यावर प्लेट्स घातल्या गेल्याने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना पाण्यामुळे कामाची अपेक्षीत गती राखण्यास मर्यादा येत होत्या.

कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून, नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर व स्थानिक नगरसेविका म्हणून माझ्याकडून सातत्याने या कामाचा पाठपुरावा व स्थळ तपासणी केली जात असून कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले गेलेत. सद्यस्थितीत नगर पंचायतीकडील मंजूर गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.

गणेशघाटाच्या सभोवती सुरु असलेले सुशोभिकरणाचे काम हे पर्यटन विभागाअंतर्गत सुरु असून याबाबत देखील पर्यटन विभागाशी समन्वय ठेवून सुशोभिकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मा. नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर, कुडाळ नगरपंचायत यांनी सबंधितांना स्थळ पहाणी दरम्यान दिल्या आहेत.

गणेश घाट सुशोभीकरणाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे व तांत्रिकदृष्ट्या जटिल स्वरूपाचे आहे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा याला प्राधान्य देऊनच नगरपंचायत प्रशासन काम करत आहे.

सदर कामाच्या प्रगतीवर नगरपंचायतीचे सातत्याने लक्ष असून संबंधित ठेकेदारास वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. मी या भागातील स्थानिक रहिवासी तसेच नगरसेविका असल्याने वर्षांनुवर्षे आमच्या तसेच बहुतांश कुडाळ वासियांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन येथे केले जात असून या कामासाठी मी, स्थानिक नगरसेविका म्हणून अधिक जागरूक व दक्ष आहे. तरी अशा प्रकल्पासाठी सर्वांनी एकत्र येऊन समस्यांचे समाधान शोधणे आवश्यक आहे.

कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार आहे. पर्यटन विभागाकडे असलेले घाटाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करून गणेश चतुर्थीपूर्वी लोकार्पण करण्याचे यापूर्वीच नियोजित आहे. त्यानुसार जलदगतीने ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे मुळात योजलेल्या व योग्य पद्धतीने पूर्णत्वास जात असलेल्या कामाबाबत अल्टीमेटम अथवा इशारा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मा. नगराध्यक्ष व कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल अशी माहिती नगरसेविका नयना मांजरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

error: Content is protected !!