गणेश घाट सुशोभीकरण गणेशोत्सव तोंडावर; १५ ऑगस्टपर्यंत काम न झाल्यास धरणे आंदोलन – अभिषेक गावडे

दोन वर्षांनंतरही गणेश घाटाचे काम अपूर्ण; ठेकेदारावर कारवाईची मागणी

कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कामाला तब्बल दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

निवेदनानुसार, गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामासाठी दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ ते ११ ऑक्टोबर २०२५ अशी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र संबंधित ठेकेदार निर्धारित कालावधीत काम पूर्ण करू शकला नाही. त्यानंतर प्रशासनाकडून ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील आजपर्यंत हे काम अपूर्णच असल्याचे गावडे यांनी नमूद केले आहे.

गणेशोत्सव तोंडावर; १५ ऑगस्टपर्यंत काम न झाल्यास धरणे आंदोलन

गणेश चतुर्थी अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना गणेश घाटाचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित ठेकेदाराच्या चालढकल भूमिकेमुळे हे काम रखडल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, गणेश घाट सुशोभीकरणाचे काम दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!