शिवसेनेचा उबाठा पदाधिकार्यांनी विचारला महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब
नानेली गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नानेली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयात उपसहाय्यक अभियंत्यांची भेट घेऊन समस्या निदर्शनास आणली.
पूर्वी नानेली गावाचा वीजपुरवठा माणगाव फीडरवरून होत होता. मात्र माणगाव फीडरवरील वाढता भार लक्षात घेऊन नानेली गावाचा वीजपुरवठा घावनाळे-शिवापूर फीडरला जोडण्यात आला. त्यानंतर शिवापूर व परिसरातील गावांमध्ये तांत्रिक बिघाड अथवा देखभाल दुरुस्तीची कामे सुरू झाल्यास नानेली गावाचाही वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली.
यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून व्यावसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी उपसहाय्यक अभियंत्यांनी संबंधित विषयाची सखोल माहिती घेऊन समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नानेली शाखाप्रमुख तेजस धुरी यांनी, ग्रामस्थांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी शिवसेना उबाठा सातत्याने पाठपुरावा करणार असून, कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत हा विषय लावून धरला जाईल,” असे सांगितले. यावेळी प्रशांत वारंग, हेमंत घाडी, संदीप नाईक, अमित मेस्त्री व विनय कदम उपस्थित होते.


Subscribe










