ओरोस न्यायालयाचा निर्णय
कणकवली तालुक्यातील वारगाव येथे राहणाऱ्या वृद्ध आईची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचा जामीन अर्ज ओरोस न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. संशयित आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप (रा. वारगाव, सुतारवाडी) याने जामिनासाठी केलेला अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी अमान्य केला. या प्रकरणातील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
ही धक्कादायक घटना १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री वारगाव येथील राहत्या घरी घडली होती. आरोपीने आपली ८० वर्षीय आई प्रभावती रामचंद्र सोरप यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली होती. या घटनेनंतर त्याने फिर्यादी भिकू सोरप यांनाही हत्याराने धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदन अहवालात अतिरक्तस्राव आणि कवटीला गंभीर दुखापत झाल्यामुळेच प्रभावती यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, तो घटनेनंतर पळून गेला होता. जामिनावर मुक्त केल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुराव्यांशी छेडछाड करू शकतो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षाने मांडला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पोलीस तपासातील ठोस पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.


Subscribe










