‘बनावट चेक’ अन् ‘फेक ऑनलाईन पेमेंट’चा व्हायरस
पुण्याच्या संशयितावर गुन्हा
कुडाळ : कुडाळ आणि परिसरातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांना बनावट धनादेश आणि ऑनलाईन पेमेंटचे खोटे मेसेज दाखवून ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुडाळ-गणेशनगर येथे साईट सुरू असल्याचे सांगून संशयिताने तातडीने इलेक्ट्रिकल साहित्याची गरज असल्याचे भासवत व्यावसायिकांचा विश्वास संपादन केला. याप्रकरणी विश्रुत भालचंद्र गधे (उर्फ विश्रुत नवाथे, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंत इंटरप्रायझेसच्या अकाऊंटंट नम्रता रामदास परब यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
घटनाक्रमानुसार, ४ जुलै रोजी संशयिताने फोन करून कॉपर वायर, अर्थिंग साहित्य व इतर उपकरणांची चौकशी केली. कोटेशन मंजुरीनंतर ११ जुलै रोजी त्याने दुकानातून १ लाख ३५ हजार ९३३ रुपयांचे साहित्य रिक्षामध्ये भरून घेतले. रोख रक्कमेची मागणी केल्यावर त्याने एनकेजीएसबी बँकेचा धनादेश दिला आणि साईटचे कारण सांगून चेक नक्की वटेल असे आश्वासन दिले. मात्र, १५ जुलै रोजी सारस्वत बँकेत धनादेश जमा केला असता खातेदाराने ‘पेमेंट स्टॉप’ केल्याचे समोर आले. त्यानंतर संशयिताचा मोबाईल बंद लागल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारदाराने या घटनेची माहिती स्थानिक व्यापारी वर्गात दिल्यानंतर संशयिताच्या कारनाम्यांचे आणखी दोन प्रकार उघडकीस आले. त्याने १३ जुलै रोजी कुडाळ येथील ‘आदिनारायण इलेक्ट्रिकल्स’मधून ४१ हजार ६०० रुपयांचे साहित्य अशाच प्रकारे बंद धनादेश देऊन लांबवले. त्यानंतर २३ जुलै रोजी पिंगुळी येथील ‘के. वाय. इलेक्ट्रिकल्स’मधून तब्बल १ लाख ६५ हजार ९१ रुपयांचा माल खरेदी केला. याचे बिल चुकवण्यासाठी त्याने खात्यात पैसे जमा झाल्याचा बनावट ऑनलाईन ट्रान्सफरचा मेसेज दाखवून व्यापाऱ्याची दिशाभूल केली.
बनावट धनादेश, पेमेंट स्टॉप करणे आणि ऑनलाईन पेमेंटचा खोटा आव आणून एकूण ३.४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याने इतरही कोणाला गंडा घातला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Subscribe










