देवगड येथे वासराच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा पूर्ववत
डोळ्याला काटा लागल्यामुळे झाली होती गंभीर दुखापत
सिंधुदुर्ग : पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत असून देवगड तालुक्यातील रामेश्वर येथे एका वासराच्या डोळ्याला काटा लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डोळा बाहेर येण्याची स्थिती निर्माण झाली. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घागर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सुमारे दोन तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. योग्य उपचार व भूल देऊन वासराचा डोळा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वासराचे प्राण वाचले असून पशुसंवर्धन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देवगड तालुक्यातील रामेश्वर येथील पशुपालक प्रसाद शेडगे यांच्या मालकीचे गाईचे वासरू तेथील परिसरातील रानात चरत असताना काटा लागल्यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन बुबुळ बाहेर आले. देवगडचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी घटनास्थळी जात त्या वासराच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा पूर्ववत केला. सुमारे दोन तास ही अवघड शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉ. घोगरे यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी, रामेश्वर गावातील पशुपालक प्रसाद शेडगे यांच्या मालकीचे वासरू तेथील परिसरात सायंकाळच्या सुमारास चरत असताना काट्याने त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन बुबुळ बाहेर आले. ही बाब लक्षात येताच श्री. शेडगे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांच्याशी संपर्क साधून सदर घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिली. डॉ. घोगरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्परतेने रामेश्वर गाठले. डोळ्यातील तीव्र वेदनेमुळे ते वासरू कोणालाही स्वतःजवळ येऊ देत नव्हते. यावेळी डॉ. घोगरे व त्यांचे सहकारी रोहित जयवंत तेली यांनी मोठ्या शिताफीने दोरीचा फास टाकून त्या वासरावर नियंत्रण मिळविले. वासराचा डोळ्याकडील भागाचा रिट्रॅक्टर स्नायू फाटला होता. त्यामुळे वासराच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. शस्त्रक्रियेसाठी वासराला भूल देताना झायलाझिनच्या गहनशामक औषधाखाली आणि ‘ऑरिक्युलोपॅलब्रल नर्व्ह ब्लॉकसह वासरावर अवघड अशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर वासराचा डोळा डॉ. घोगरे यांनी पूर्ववत करून दिला.



Subscribe










