स्विमिंग पूलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

उंचावरून उडी मारणं बेतलं जीवावर

मालवण वायरी येथील घटना

मालवण : छोट्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं युवा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास घडली. श्रेणीक मिलींद टाकळे (२५, रा. इस्लामपूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) असं या तरुणाचं नाव आहे. स्विमींग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोकीला गंभीर दुखापत झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कागल येथील दहा मित्र शनिवारी पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते, ते वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्ट मध्ये रिसॉर्ट मध्ये उतरले होते. दुपारी काही मित्र रूममध्ये होते तर काही मित्र स्विमींगचा आनंद लुटत होते. छोट्या स्विमींगपूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीक याने आठ ते दहा फुटावरून उडी घेतली. त्याची उंची कमी असल्याने त्याची उडी थेट पुलाच्या तळाशी जावून त्याचे डोके आपटले. यात डोकीला दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहकारी मित्रांनी तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. श्रेणीक हा अविवाहीत होता. त्याच्या कुटुंबियांना दुर्घटनेची माहिती दिल्यानंतर त्याचे वडील व अन्य कुटुंब रात्री मालवणात दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येत होती. श्रेणीक यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पेडणेकर हे करीत आहेत.

error: Content is protected !!