कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायतीमार्फत दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी जीव्हीपी पॉइंट (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने कणकवली नगरपंचायतीने अशा ठिकाणांचे निर्मूलन करून त्यांचे सुशोभीकरण करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत शिवाजीनगर येथील अरोमा हॉटेलसमोरील जीव्हीपी पॉइंटवरील कचरा पूर्णपणे हटवून त्या जागेचे आकर्षक रूपांतर करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या पर्यावरणपूरक विचाराला मूर्त स्वरूप देण्यात आले आहे.
सुशोभीकरणासाठी जुन्या टायरांचा कुंड्यांप्रमाणे वापर करण्यात आला असून त्यामध्ये विविध शोभिवंत व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच नागरिकांसाठी बैठक व्यवस्थाही उभारण्यात आल्याने परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. पूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या या जागेचे आता स्वच्छ, हरित आणि आकर्षक सार्वजनिक स्थळात रूपांतर झाले आहे.
या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश देण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. शहरातील इतर ठिकाणीही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, नगरपंचायतीने नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकता घरगुती कचरा नियमितपणे घंटागाडीमार्फतच देण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Subscribe








