कुडाळ : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पिंगुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंधयाळे येथे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
टाळ, मृदुंग, नामघोष आणि अभंगांच्या गजरात काढण्यात आलेल्या या दिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि सांस्कृतिक वारसा यांची ओळख करून देण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेचे व सादरीकरणाचे पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले. आषाढी एकादशीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.