“मी… दशावतार बोलतेय!”

दशावतार ही कोणाची खासगी मालमत्ता नाही; ती आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा – समीर तुकाराम म्हाडेश्वर

दशावतार ही केवळ एक लोककला नाही, तर कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा श्वास आहे. जवळपास आठशे वर्षांची परंपरा असलेली ही कला आजही हजारो कलाकार, शेकडो दशावतार मंडळे आणि लाखो रसिकांच्या प्रेमामुळे जिवंत आहे. मात्र बदलत्या काळात निर्माण होत असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर दशावतार परंपरेत संवाद, परस्पर सन्मान आणि एकजूट कायम राहणे आवश्यक असल्याचे मत दशावतार अभ्यासक समीर तुकाराम म्हाडेश्वर यांनी व्यक्त केले आहे.
याच भावनेतून त्यांनी “मी… दशावतार बोलतेय!” या शीर्षकाखाली एक भावनिक मनोगत प्रसिद्ध केले आहे. या मनोगतात त्यांनी दशावतार कलेलाच बोलते करून तिच्या वेदना, आनंद, संघर्ष आणि अपेक्षा मांडल्या आहेत.
“मी… दशावतार बोलतेय!”
होय… मीच ती दशावतार लोककला…
आठशे वर्षांपासून कोकणच्या पवित्र मातीत रुजलेली…
संत, भक्त, कलाकार, मालक आणि रसिक यांच्या प्रेमाने वाढलेली…
मी केवळ एक नाट्यप्रयोग नाही…
मी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे.
माझ्यासाठी कित्येक मालकांनी आयुष्यभर कष्ट केले…
कर्ज काढले…
तोटा सहन केला…
स्वतःच्या संसारापेक्षा मला मोठे मानले…
असंख्य कलाकारांनी भूक, तहान, थकवा विसरून मला जिवंत ठेवले…
वादकांनी रात्रभर जागून माझ्या सुरांना प्राण दिला…
आणि रसिकांनी टाळ्यांच्या गजरात मला अमर केले.
म्हणूनच मी आजही जिवंत आहे.
पण…
आज माझ्या मनात एक वेदना आहे…
माझ्याच नावावरून माझी माणसं एकमेकांविरुद्ध उभी राहताना पाहते…
आरोप-प्रत्यारोप करताना पाहते…
एकमेकांचा सन्मान कमी करताना पाहते…
आणि ते पाहून माझे मन व्यथित होते.
माझ्या लेकरांनो…
मालक नसतील तर माझा रंगमंच कोण उभा करेल?
कलाकार नसतील तर माझ्या पात्रांना जीव कोण देईल?
रसिक नसतील तर माझ्या कलेला दाद कोण देईल?
म्हणून मला एकच सांगायचे आहे…
माझ्यासाठी भांडू नका… माझ्यासाठी एकत्र या.
कलाकारांचे हक्क मिळाले पाहिजेत…
त्यांना शासनाच्या सर्व योजना, अनुदान आणि सुविधा मिळाल्याच पाहिजेत…
यासाठी बहुसंख्य मालक वर्गही त्यांच्या पाठीशी उभा आहे.
परंतु काही मतभेदांमुळे संपूर्ण मालक वर्गाची प्रतिमा चुकीची उभी राहणेही योग्य नाही.
लक्षात ठेवा…
मालक हा फक्त मालक नसतो… तो एका मंडळाचा कुटुंबप्रमुख असतो.
तो कलाकारांची जबाबदारी घेतो…
आर्थिक संकटे झेलतो…
मंडळ टिकवण्यासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवतो…
त्याचप्रमाणे कलाकार हा माझा आत्मा आहे…
त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे.
म्हणून…
मालक आणि कलाकार हे विरोधक नाहीत… ते माझ्या अस्तित्वाचे दोन आधारस्तंभ आहेत.
एक स्तंभ कोसळला…
तर माझे संपूर्ण अस्तित्व धोक्यात येईल.
आज गरज आहे…
संवादाची…
विश्वासाची…
आणि एकजुटीची…
सोशल मीडियावर किंवा सभांमध्ये एकमेकांवर आरोप करून माझे रक्षण होणार नाही.
माझे रक्षण होईल…
जेव्हा मालक, कलाकार आणि रसिक एकत्र येऊन शासन दरबारी माझ्यासाठी लढतील.
मी कोणाची नाही…
मी तुमच्या सर्वांची आहे.
मी कलाकाराच्या कलेत आहे…
मी मालकाच्या कष्टात आहे…
मी वादकाच्या सुरात आहे…
मी रसिकांच्या टाळ्यांत आहे…
माझे अस्तित्व तुमच्या एकजुटीत आहे.
माझी एकच विनंती…
माझा मान राखा…
माझी माणसं जपा…
माझी परंपरा जपा…
कारण…
मीच तुमची ओळख आहे…
मी… तुमची दशावतार लोककला बोलतेय…!
समीर तुकाराम म्हाडेश्वर यांचे आवाहन
“दशावतार वाचवायचा असेल तर मालक आणि कलाकार यांच्यातील विश्वास अबाधित राहिला पाहिजे. शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करूया. मतभेद असू शकतात, पण मनभेद होऊ देऊ नका. कारण आपण कोणाच्याही विरोधात नाही, तर आपल्या ८०० वर्षांच्या लोकपरंपरेच्या बाजूने आहोत.”
“दशावतार जपा… कलाकार जपा… मालकांचा सन्मान जपा… आणि आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करा.”

– समीर तुकाराम म्हाडेश्वर

error: Content is protected !!